सरकारने मोह फुलांवर असलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.
कित्येक वर्षांपासून मोहफुलांवर बंदी होती. आता मोह फुलांवर असलेली बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे जंगलात राहणाऱ्या गरीब आदिवासींना याचा नक्कीच आर्थिक फायदा होऊ शकेल. कारण मोहफुले गोळा करणे व विकणे हे त्यांचे एक रोजगाराचे साधन आहे.
आता काय होईल ?
मोहफुलांचे संकलन, बाळगणे, खरेदी व वाहतुकीसाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ नुसार यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यामुळे मोहफुलांच्या संकलन तसेच विक्रीवर आधारित उपजीविका असणाऱ्या आदिवासी समाजाला अडचणी होत होत्या. हे निर्बंध हटवण्यासाठी वन विभागाचे तत्कालीन सचिव 'विकास खारगे' यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अहवालानुसार आता निर्बंध हटवण्यात आलेत.
यानुसार मोहफुलांच्या परराज्यातील निर्यातीचे धोरण खुले असले तरी निर्यात परवाना आवश्यक राहणार आहे. फुले संकलनाचा वार्षिक कोटा खाजगी व्यक्तीसाठी ५०० क्विंटल राहील. तर संकलन, साठवणूक आणि विक्रीसाठी परवाना आवश्यक असेल. हा परवाना आदिवासी क्षेत्रातील सहकारी संस्था, आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, ग्रामपंचायत यांना घ्यावा लागणार आहे.
गडचिरोली सारख्या भागात सीझनच्या वेळी बहुतेक आदिवासी कुटुंब मोहफुले गोळा करतात. एक कुटुंब १०-१२ दिवसांत एक ते दीड टन मोहफुले गोळा करते. नंतर ही फुले ४०-४५ रुपये दराने विकली जातात. सीझनमध्ये त्यांना २० ते २५ हजारांचा फायदा होतो. मात्र फुले खरेदी करणारे भीती दाखवून कमी दराने खरेदी करतात. आता बंदी उठवल्याने त्यांना मोहफुले कायदेशीरपणे विकता येतील. वनहक्क प्राप्त ग्रामसभा तसेच वनधन विक्री केंद्राच्या माध्यमातून फुले खरेदी करण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक लाभ मिळतो.
मोहाचे झाड
आदिवासी समाजाद्वारे मोहफुल झाडाला 'माऊली' म्हणून ओळखले जाते. म्हणून त्यांनी मोहाच्या वृक्षांना जतन करून ठेवले आहे.
याचे शास्त्रीय नाव 'मधुका इंडिका' आणि 'मधुका लॉंजीफोलिया' (Madhuca longifolia) असून वृक्षाचे मूळ स्थान भारत आहे. मोहाला वसंत ऋतूत फुले लागतात. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओरिसा, बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, आणि गुजरातच्या डांग भागांत कमी-अधिक प्रमाणात हे वृक्ष आढळतात.
महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भ इत्यादी ठिकाणी मोहाची झाडे आढळून येतात. जव्हार, मोखाडा व मुरबाड तालुक्यातील लोक मोहाची फुले आणि बिया गोळा करून त्याची स्थानिक पातळीवर विक्री करतात वा तेल काढतात. हा वृक्ष वनसंर्धनासाठी अतिशय उपयुक्त समजला जातो.
मोहफुले आणि त्यापासून तयार केलेले इतर उपयुक्त पदार्थ
वनोत्पादनामध्ये मोह वृक्ष अत्यंत महत्वाचा असून तो औषधी व व्यावसायिक उपयोगासाठी प्रसिद्ध आहे. मोहाला हिंदी व इंग्रजीमध्ये 'महुआ' (Mahua) म्हणून ओळखले जाते.
आपल्याला आश्चर्य वाटेल पण छत्तीसगडमध्ये तर एका ठिकाणी आदिवासी जमातीच्या लोकांनी मोहाच्या फुलांपासून हँड सॅनिटायझर बनवले. त्याला नाव दिले 'मधुकम!'
मोहफुलांपासून तयार केलेले पौष्टिक लाडू
मोहफुले, दारू आणि आदिवासी!
मोहफुलांपासून दारू बनते. परंतु दारू फक्त मोहापासूनच बनते असे नाही. द्राक्षे, ऊस, संत्री, तांदूळ याशिवाय गव्हापासूनही दारू तयार केली जाते. मात्र यावर बंदी घातली गेली नव्हती.
भारतात मद्यनिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून मोहाच्या फुलांचाही वापर होतो. फेब्रुवारीमध्ये या फुलांना थोडा उग्र वास असतो व तो मद्यालाही येतो. सुश्रुतांनी मोहाच्या ऊर्ध्वपातीत मद्याचा उल्लेख केला आहे. मोलॅसिसपासून मिळणाऱ्या मद्यापेक्षा दीडपट अधिक उत्पादन तेवढ्याच वजनाच्या मोहाच्या फुलांपासून मिळते. आदिवासी लोकांमध्ये मोहाची दारू बनवण्याचे 'खास कौशल्य' पाहावयास मिळते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या अहवालानुसार मोहफुलांमध्ये द्राक्षांपेक्षा अधिक न्यूट्रिशन असते. शिवाय व्हिटॅमिन ए, डी, फॉस्फरस आणि कॅल्शियमसाठीही मोहाचे महत्त्व आहे. महत्वाचं म्हणजे द्राक्षे किंवा संत्र्यावर कीटकनाशकांचा मारा असतो. पण मोह म्हणजे कोणतीही फवारणी न करता तयार झालेले शुद्ध नैसर्गिक खाद्य आहे.
मात्र केवळ दारुशी संबंध जोडून आदिवासी समाजाच्या शुद्ध खाद्याला दूर ठेवण्याचे प्रयत्न मुद्दामहून केले जातात. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मोहफुलांचे महत्त्व समजले आहे.
भरपूर ग्लुकोज असलेली ही फुले भाजून किंवा नुसती वाळवूनही खातात. ही वाळवलेली फुले किशमिशसारखी पौष्टिक व रुचकर असतात.
फुलांपासून व्हिनेगार, अल्कोहोल व त्यापासून इंधननिर्मिती होऊ शकते.
मोहाच्या फुलांचा मध इतर मधापेक्षा गोड असतो.
फुलांच्या रसाचा वापर कफ, खोकला, दमा यासारख्या आजारात होतो.
आम्लपित्ताच्या रोग्यांनाही मोहाचे फुल उपयोगी आहे.
फुलांचा रस- यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे टॉनिक म्हणून उपयुक्त आहे. दाह होत असलेल्या ठिकाणी चोळल्यास गुणकारी आहे.
वंध्यत्व व शारीरिक दुर्बलता विकारांमध्ये दुधामध्ये मिसळून फुलांचा वापर केला जातो.
फुलांचा भाजी व खाद्यपदार्थ बनविण्यासाठी उपयोग होतो. मोहाच्या फुलांच्या पाकळ्यांत नैसर्गिक शर्करा व जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची उकळून भाजी केली जाते.
पारंपारिक पदार्थ जसे हलवा, खीर, बर्फी यांना गोडी आणण्यासाठी ही फुले वापरली जातात. भात, ज्वारी, नाचणी किंवा रताळ्यासोबत फुलांचा वापर करून गोड भाकरी किंवा केक बनवले जातात.
जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे मोहाच्या फुलांचा वापर पशुखाद्यामध्ये केला जातो, त्यामुळे दुधामध्ये वाढ होते.
अनेक संशोधनामध्ये मोहाच्या फुलांमध्ये जिवाणुरोधक, वेदनाशामक, यकृताच्या व्याधीमध्ये उपयुक्त, कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे पुढे आले आहे.
मोह- एक 'बदनाम' परंतु औषधी वृक्ष
मोहाच्या झाडाचे लाकूड, साली, पाने, फुले, फळे, बिया यांचे विविध उपयोग असून आदिवासींच्या अन्नात तर कायम मोहफुलांचा समावेश राहिला आहे. मोहापासून लाडू, मिठाई, ज्यूस इत्यादी गोष्टी तयार केल्या जातात. प्रक्रिया करून इतरही अनेक पदार्थ तयार करता येतील. मोहफुलांसह इतर वनसंपदेसाठी 'प्रक्रिया उद्योग' स्थापन करून त्याचा प्रसार करता येईल.
मोहाची फुले मर्यादित काळासाठीच उपलब्ध असतात. त्याचा टिकवण कालावधीही खूप कमी आहे. त्याचे औषधी गुणधर्म आणि इतर उपयोग लक्षात घेता, मोहाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संधी आहेत.
मोहाचे झाड व मोहफुले यांच्यावर आणखी संशोधन झाल्यास चालना मिळून त्याचे आर्थिकदृष्ट्या निश्चितच महत्त्व वाढू शकते. तसेच उद्योजक पुढे आल्यास त्याची मार्केटिंग करून निर्यात करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते आणि पूरक उद्योग वाढू शकतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा