मांजरसेनेचा विजयी वापर।तुम्ही एकला का?
इ.
स. पूर्व ६ व्या शतकाचा काळ आहे. तुम्ही इजिप्तच्या सैन्यातील एक पराक्रमी
सैनिक आहात. थोडयाच वेळात तुमचे पर्शियन सेनेविरुध्द घनघोर युद्ध होणार
आहे. तुमच्या अंगामध्ये शत्रुसैन्याला नेस्तनाबूत करण्याची खुमखुमी संचारली
आहे. आज किमान दोन तीन डझन शत्रुसैनिकांना यमसदनी पाठविल्याशिवाय तुम्ही
शांत बसणार नाही आहात.
समोर
रणभूमीवर धुळीचे लोण उडताना दिसत आहेत. अवघ्या काही क्षणात शत्रुसैन्य
तुमच्या दृष्टिक्षेपात येणार आहे. तुमची हत्यारे सावरून तुम्ही युद्धाचा
पवित्रा घेता न घेता तोच तुमच्या लक्षात येते की,
अरेच्चा,
शत्रुसैन्य तर समोर दिसत नाही आहे त्याऐवजी समोर शेकडो मांजराची सेना
दिसते आहे. ती अजब सेना अजून जवळ आल्यावर तुमच्या लक्षात येते की
मांजरांच्या मागे पर्शियन सैनिक पण तुमच्या रोखाने येत आहेत. अरे बापरे! पण
हे काय त्यांच्या ढाली पण मांजरासारख्या रंगविलेल्या दिसतात आहेत.
तुम्ही
पडला इजिप्शियन. त्यात मांजर म्हणजे तुमच्यासाठी जीव की प्राण. तुमची
सगळ्यात आवडती देवी पण मांजररुपधारी आहे. तसेच तुमच्या देशात मांजराला
मारणे हा भयंकर गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा आहे मृत्युदंड.
आता
समोरच्या सुंदर छोट्या छोट्या मांजरांच्या सेनेशी लढाई करायची की
त्यांच्याकडे प्रेमाने किंवा हतबलतेने बघत राहायचे हेच तुम्हाला समजेनासे
झालंय. थोडक्यात तुम्ही अगदी धर्मसंकटात सापडला आहात.
असाच
काहीसा प्रकार इ. स. पू. ५२५ सालच्या पेल्शियम युद्धामध्ये घडला. हे युद्ध
इजिप्शियन फारो पसामेटीक तिसरा विरुद्ध पर्शियन राजा कॅम्बीसेस दुसरा
ह्यांच्या सेनेमध्ये लढले गेले.
युद्धाचे
कारण पण खूप विचित्र होते. कॅम्बीसेसने पसामेटीकच्या वडिलाकडे त्यांच्या
मुलीचा लग्नासाठी हात मागितला. पण आपल्या मुलीच्या आयुष्याची लग्नानंतर
दुर्दशा होईल असे वाटल्याने त्याने फसवेगिरी करून आपल्या मुलीऐवजी दुसरीच
मुलगी पर्शियन सम्राटाकडे पाठवून दिली होती. झाला प्रकार लक्षात आल्यावर
पर्शियन सम्राटाला त्याचा भयंकर राग आला आणि इजिप्तला नेस्तनाबूत
करण्याच्या उद्देशाने त्याने हल्ला केला.
इजिप्तमध्ये
प्रवेश करण्यासाठी नाईल नदीच्या तीरावरील पेल्शियम हे खूप मोक्याचे ठिकाण
होते. म्हणून कॅम्बीसेसने तिथूनच युद्धाची सुरुवात करण्याचे ठरविले. तो खूप
चतुर राजकारणी होता.
इजिप्शियन
संस्कृतीमध्ये मांजर प्राण्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे ते त्याला
माहिती होते. तेव्हा इजिप्शियन लोक मांजरांना आपल्या कुटुंबाचा एक भाग
मानत. समजा घरातील मांजर मेले तर भुवया काढून दुखवटा साजरा केला जाई. तसेच
समजा एखाद्या घराला आग लागली तर त्या घरातील मांजरांना पहिले वाचविले जायचे
आणि त्यानंतर माणसांना. तसेच मांजरांना मारण्याची शिक्षा होती मृत्युदंड.
इजिप्शियन
लोकांच्या ह्याच कमजोरीचा फायदा पर्शियन सैन्याने घेण्याचे ठरविले.
पेल्शियम युद्धासाठी मांजराची एक फौज बनविण्यात आली. तसेच सैनिकांच्या
ढालींना पण मांजरांसारखा रंग देण्यात आला.
इजिप्शियन
सैन्याने जेव्हा मांजरांना युद्धभूमीवर बघितले तेव्हा त्यांच्यावर आक्रमण
करण्यास नकार दिला आणि युद्ध सोडून पळू लागले. त्यांचा पाठलाग करून पर्शियन
सैन्याने शत्रुसैन्याचा खात्मा केला. त्याशिवाय इजिप्शियन फारो (राजा) पण
पकडला गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा