Hot Widget

Breaking

सोमवार, १ मार्च, २०२१

महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कुठे आहे? / 2 जगातील सर्वात विषारी झाड कोणते आहे? त्याच्या विषाचा परिणाम काय होतो?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कुठे आहे? / 2 जगातील सर्वात विषारी झाड कोणते आहे? त्याच्या विषाचा परिणाम काय होतो?


महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ठिकाणी आहे. हे वडाचे झाड असून विस्ताराच्या बाबतीत याचा भारतातून पाचवा क्रमांक लागतो. या झाडापासून जवळच पेमगिरी उर्फ शहागड किल्ला आहे.


पेमगिरीच्या या झाडाचा विस्तार जवळजवळ तीन एकर परिसरात झाला आहे. पेमगिरीच्या या महाकाय वटवृक्षाच्या मुख्य खोडाचा घेर ६० फूट आहे आणि त्याच्या पारंब्यांची संख्या ९० पेक्षा जास्त आहे. वाढलेल्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या, की त्यालाच मुळे फुटून नवीन झाड जन्म घेते. अशाप्रकारे शेकडो पारंब्या जमिनीत रुजून हा विशाल वटवृक्ष वाढत गेला.

दोन तीनशे वर्ष जुन्या या वटवृक्षाच्या मूळ खोडाखाली रामोशी समाजाचे लोकदैवत जामखत बाबा आणि त्यांची बहीण जाखाई यांचे देऊळ आहे. या झाडाच्या फांद्या किंवा पारंब्या तोडल्यास जामखत बाबा त्याला धडा शिकवतो अशी आख्यायिका इथे प्रसिद्ध आहे. त्यामुळे या झाडाला कुणी हात लावायची हिम्मत करत नाही. यामुळेच या झाडाचे महावृक्षात रूपांतर होत गेले.

जामखत बाबांचे देऊळ


भारतात पारंब्यांपासून विस्तीर्ण होत गेलेले असे फक्त १५० महावड तग धरून आहेत. त्यातील काही निवडक महावड पुढीलप्रमाणे, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील थीमम्मा मरीमानु हे वडाचे झाड प्रथम क्रमांकावर (४.७१ एकर) आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोलकात्यातील ग्रेट बनियान ट्री नावाने प्रसिद्ध असलेल्या झाडाचा विस्तार ४.६७ एकर परिसरात झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील भरूच शहरातील ४.३३ एकर परिसरात वाढलेले कबीरवड आहे. तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यात ४ एकर परिसरात वाढलेले पिल्लालमर्री हे ८०० वर्ष जुने झाड चौथ्या क्रमांकावर येते. पाचव्या क्रमांकावर पेमगिरी महावृक्ष आहे.

2 जगातील सर्वात विषारी झाड कोणते आहे? त्याच्या विषाचा परिणाम काय होतो?


१९९९ साली एक क्ष-किरणतज्ज्ञ आणि तिची मैत्रीण टोबॅगो बेटावर सहलीसाठी गेल्या होत्या. तेथील समुद्र किनाऱ्यावर आंबे आणि नारळ गोळा करत असताना त्यांना काही हिरव्या रंगाची, छान वासाची छोट्या सफरचंदासारखी दिसणारी फळे दिसली. दोघांनाही ती फळे खाण्याचा मोह आवरला नाही.

फळाचा छोटासा तुकडा खाऊन झाला असेल नसेल तोच दोघींचाही घसा जळजळायला लागला, मिरच्या झोम्बल्यानंतर जश्या वेदना होतात तश्या काहीश्या वेदना त्यांना होऊ लागल्या. काही क्षणांत त्यांच्या घश्याला खूप सूज आली आणि त्यामुळे त्यांना काही गिळण्यास पण जमेना. काही तासांच्या उपचारानंतर दोघीही बऱ्या झाल्या.

त्यांनी नजरचुकीने मॅंचिनेल झाडाची फळे खाल्ली होती.

वरकरणी खूप निरुपद्रवी वाटणारे मॅंचिनेल झाड जगातली सर्वात विषारी झाड म्हणून ओळखले जाते. हे झाड प्रामुख्याने कॅरिबियन बेटे, फ्लोरिडा, बहामास, मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळून येते.

  • गोड वासाची, पेरूसारखी दिसणारी ह्या झाडाची फळे माणसाचा जीव घेऊ शकतात.
  • ह्याच्या पानांना स्पर्श केल्याने अंगावर वेदनादायी व्रण उठू शकतात.
  • इतकेच नव्हे तर पावसात ह्या झाडाखाली निवाऱ्यासाठी उभे राहिल्याने विषबाधा होऊ शकते.
  • ह्या झाडाला जाळल्यास त्यातून निघणारा विषारी धूर तुम्हाला थोडा वेळ आंधळा बनवू शकतो.

मॅंचिनेल झाडांमध्ये अनेक विषारी घटक असतात. त्यापैकी फोरबॉल हा घटक अत्यंत हानिकारक असतो.


असे जरी असले तरी मॅंचिनेल झाडाचे काही फायदे सुद्धा आहेत.

  • गेल्या कित्येक शतकांपासून कॅरिबियन सुतार ह्या विषारी झाडाचा वापर फर्निचर बनविण्यासाठी करीत आले आहेत. त्यासाठी हे झाड खूप काळजीपूर्वक तोडले जाते आणि काही दिवस उन्हामध्ये सुकविले जाते. जेणेकरून त्यातील विषारीपणा निघून जाईल.
  • पर्यावरणाचा समतोल राखण्यात पण हि झाडे खूप महत्वाची भूमिका निभावतात. ह्या झाडांची मुळे जमिनीत घट्ट रुतलेली असतात जी किनारपट्टीची धूप होण्यापासून प्रतिबंध करतात.
  • प्राचीन काळी युद्धादरम्यान ह्या झाडांचा वापर शत्रूचे पाण्याचे स्रोत दूषित करण्यासाठी केला जायचा.
  • स्थानिक लोक मॅंचिनेल फळांचे विष बाणाच्या टोकाला लावायचे तसेच शिक्षा म्हणून अपराध्यांना ह्या झाडाला बांधून ठेवायचे. कालान्तराने त्यांचा वेदनांनी तळमळून मृत्यू व्हायचा.
https://www.shutterstock.com/g/vishu+Dhindale?rid=294184385&utm_medium=email&utm_source=ctrbreferral-link





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: